सुपा -पारनेर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात औद्योगिक वसाहतीमुळे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून शहराचा विस्तार पाहता आरोग्य उपकेंद्राची सेवा तोडकी पडत असल्याने या प्राथमिक उपआरोग्य केंद्राचे ्रआरोग्य केंद्रात रूपांतर करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रतापसिंह शिंदे, ऍड. सुरेश नेटके, सामाजिक कार्यकर्ते संतोष शितोळे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सुपा येथे आरोग्य उपकेंद्र अस्तित्वात आहे. परंतु आज सुपा येथील लोकसंख्या जवळपास 25 हजारांपर्यंत पोहोचली असल्याकारणाने आरोग्य उपकेंद्रांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. यामुळे परिणामी जीवित हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मुख्य आरोग्य केंद्र रुईछत्रपती याठिकाणी अस्तित्वात आहे.
परंतु रुग्णांना उपचार घेण्यासाठी वाहतूक सुविधा नसल्याने व एसटी बसेस या गावी जात नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. ती थांबवण्यासाठी आपण सुपा प्राथमिक उपकेंद्राचे आरोग्य केंद्रामध्ये रूपांतर होण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आरोग्य मंत्री टोपे यांनी याबाबत निश्चित पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले.