- उपायुक्त स्मिता झगडे यांना बढती
- सहाय्यक आयुक्त खांडेकर, जोशी यांची बदली
पिंपरी, दि. 13 – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली झाली असून त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ पदावर पाठविण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर आणि प्रशांत जोशी यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये बदली झाली. तर महापालिकेतील उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांची 16 ऑगस्ट रोजी तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती झाली. त्यानंतर महापालिकेतील पाटील यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांनी बदलीसाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा होती. त्यानुसार आज (मंगळवार) महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे हे प्रतिनियुक्तीवर रेल्वेतून दीड वर्षांपूर्वी पिंपरी महापालिकेत आले होते. त्यांचीही मूळ रेल्वेमध्ये बदली करण्यात आली. तर निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर आणि त्यांचे मित्र भूमी जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांचीही बदली करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून आलेल्या स्मिता झगडे यांची यापूर्वी उपायुक्त म्हणून प्रमोशन झाले होते. आता झगडे यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.