Train Accident : तामिळनाडूमध्ये, चेन्नईच्या उपनगरीय इलेक्ट्रिसिटी मल्टीपल युनिट (EMU) ट्रेनचे तीन रिकामे डबे अवडी रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरले, ज्यामुळे सुमारे डझनभर गाड्यांना उशीर झाला. परिणामी या व्यग्र मार्गावरील गाड्या आज उशिराने धावत होत्या. पहाटे ५.४० च्या सुमारास हा अपघात घडला. डबे रिकामे असल्याने त्यात प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
चार डबे रुळावरून घसरल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते; परंतु दक्षिण रेल्वेने नंतर तीन डबे घसरल्याचे स्पष्ट केले. उपनगरीय ट्रेनचे शेवटचे तीन डबे ०५:४० वाजता आवडी ईएमयू कारशेडमधून मुख्य मार्गावर जात असताना आवाडी रेल्वे स्थानकावर रुळावरून घसरले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. अपघातामुळे झालेल्या ओव्हरहेड वायरमधील बिघडामुळे मुख्य मार्गावर वाहतुकीस व्यत्यय येऊन चेन्नई सेंट्रलकडे जाणारी उपनगरीय सेवा प्रभावित झाली.
चेन्नई सेंट्रलकडे जाणाऱ्या पाच अएमयू गाड्या उशिराने धावल्या. येथून तीन एक्स्प्रेस गाड्या-वंदे भारत आणि शताब्दी सेवा म्हैसूरपर्यंत आणि चेन्नई-कोइम्बतूर कोवई एक्स्प्रेस अंबत्तूर रेल्वे स्थानकाजवळ नियमित करण्यात आल्या.
चेन्नई सेंट्रलवरून निघणाऱ्या सप्तगिरी एक्स्प्रेस (चेन्नई-तिरुपती) आणि बेंगळूरकडे जाणारी वृंदावन एक्स्प्रेस आणि डबल डेकर एक्स्प्रेसचे वेळापत्रक बदलण्यात आले. दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असल्याचे रेल्वेने सांगितले.