मुंबई – अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र आता रणबीर कपूरने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. रणबीर सहा महिन्यांचा ब्रेक घेणार आहे. अचानकपणे ब्रेक घेण्याच्या त्याच्या निर्णयामागचे कारणही त्याने स्पष्ट केले आहे.
रणबीरने अभिनेत्री आलिया भट्टसोबत लग्न केल्यानंतर त्याला राहा नावाची एक मुलगी आहे. रणबीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुलगी राहासोबत वेळ घालण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेणार असल्याचे सांगितले आहे. रणबीरला त्याच्या पालकत्वाच्या कर्तव्यांवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे कारण आलिया तिच्या आगामी जिगरा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. राहाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी त्याने काही काळासाठी हा निर्णय घेतला आहे.
यावेळी रणवीरने त्याच्या आणि राहाच्या बॉण्डिंगबाबत देखील सांगितले. रणबीरने म्हणाला की, राहा चालायला लागली आहे आणि गोष्टी ओळखू लागली आहे. राहा बोलण्याचा प्रयत्न करते, असे रणबीरने सांगितले. आजकाल राहा आई आणि वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. रणबीरने या टप्प्याचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे.