औंध येथे साकारत आहे ट्रॅफिक प्लाझा; नियमांची माहिती मिळणार
औंध – औंध येथील ब्रेमन चौक येथे लहान मुलांसाठी ट्रॅफिक प्लाझा साकारला जात आहे. या प्रकल्पांमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. जागा ताब्यात मिळत नसल्याने स्थानिकांच्या विरोधातून हा प्रकल्प बंद होण्याची शक्यता असताना नगरसेविका अर्चना मुसळे व ऍड. मधुकर मुसळे यांनी पुढाकार घेतल्याने या प्रकल्पाचे काम वेगाने चालू झाले आहे.
लहान मुलांना एखादी गोष्ट शिकविली तर मुले त्या सवयीचा आयुष्यभर उपयोग करतात. या हेतूने मुलांना बालवयातच वाहतुकीचे नियम समजावेत तसेच लहान वयापासूनच त्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे सवय लागावी या हेतूने औंध येथील राजभवन रस्त्यावरील ब्रेमन चौक येथे अडीच एकर जागेमध्ये महानगरपालिकेच्या विभागामार्फत लहान मुलांसाठी ट्रॅफिक प्लाझा विकसीत करण्याचे काम चालू आहे.
डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथील ट्रॅफिक पार्क ज्या वेळी अधिकाऱ्यांनी पाहिले, त्यावेळी पुण्यातही असे ट्रॅफिक पार्क असावे, असा मानस होता. त्यानंतर औंध येथे पार्क साकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला.
ट्रॅफिक पार्क मध्ये मिनी सिग्नल, चिन्हांकित रस्ता, झेब्रा क्रॉसिंग, पदपथ, दुचाकी पार्किंग, गॅस स्टेशन, बस थांबे,रहदारी दिवे, मिनी ऍम्फीथिएटर, सॅंडपिट आणि लहान मुलांसाठी व्यायामाची उपकरणे तसेच पालक व शिक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्थेची देखील या ठिकाणी सोय करण्यात येणार आहे, असे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे यांनी सांगितले.