पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) स्वारगेट मुख्यालयात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांची प्रशासनाने तडकाफडकी बदली करून दहा दिवस उलटले आहेत. मात्र, हे कर्मचारी पूर्वीच्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत.
दोघांनाही तत्काळ नव्या बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाचे आदेश कर्मचारी जुमानत नसल्याचे दिसून आले आहे.
स्वारगेट मुख्यालयातील हेल्पर कम ड्रायव्हर असलेले गणेश कवठेकर आणि संचालक मंडळ कार्यालयातील लिपिक असिफ झारी या दोन्ही कर्मचाऱ्यांची प्रशासनाने 18 फेब्रुवारीला शेवाळवाडी डेपोत तडकाफडकी बदली केली. त्यांना 20 तारखेपासून तत्काळ नव्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोघांनीही ही आदेश डावलले आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.