देऊळगावराजे – सिध्दटेक (ता.कर्जत) येथील सिद्धिविनायक मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त पहाटे चार वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
यावेळी दौंड, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यातुन कोणी चालत तर कोणी वाहनांमध्ये येऊन दर्शन घेतले. सिध्दटेकला सकाळी पासून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अष्टविनायक महामार्गाचे काम चालू असल्यामुळे ठीकठिकाणी वाहनांची गर्दी झाली होती. श्रींच्या मुर्तीला पहाटे स्नान घालुन अभिषेक करण्यात आला.
त्यानंतर मंदीर दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले. दुपारी बारा वाजता श्रींना नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर चिंचवड देवस्थानकडून आलेल्या भाविकांना खिचडीचा प्रसाद देण्यात आला. यावेळी देवस्थानच्यावतीने भाविकांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.