नगर (प्रतिनिधी) – टेम्पोतून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणार्या दोघांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शेतकरी चांगदेव गोरख भालसिंग (वय ३१ रा. धोंडेवाडी, वाळकी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. अहमद अशरफ कुरेशी (वय ४१ रा. जुन्नर ता. जुन्नर, जि. पुणे) व जलाल इस्माईल शेख (वय ४० रा. ममदापूर ता. राहाता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
त्यांच्या ताब्यातून तीन लाखाचा टेम्पो व एक लाख २५ हजाराचे म्हशी (दोन वर्ष वयाच्या) असा ४ लाख २५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रविवारी (दि. ३१) रात्री साडेबाराच्या सुमारास आरणगाव चौक बायपास (ता. नगर) शिवारात ही कारवाई करण्यात आली. एका टेम्पोतून दाटीवाटीने जनावरांची वाहतुक केली जात असल्याची माहिती चांगदेव भालसिंग व इतरांना मिळाली होती.
त्यांनी सदरचा टेम्पो आरणगाव शिवारातील बायपास चौकात पकडला. त्यानंतर नगर तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पंचासमक्ष टेम्पोची पाहणी केली असता त्यात २५ म्हशी मिळून आल्या. दाटीवाटीने वाहतुक केल्याप्रकरणी दोघांवर मोटार वाहन अधिनियम व मुंबई पोलीस अधिनियमनुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार शिवाजी खरात अधिक तपास करत आहेत.