नवी दिल्ली – वाढत्या महागाईविरोधात पाकिस्तानमधील व्यापाऱ्यांनी आजपासून संपाला सुरुवात केली आहे. इंधनाच्या भडकलेल्या किंमती आणि भरमसाठ वीजबिलांनाही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. पाकिस्तानी रुपयाचे डॉलरच्या तुलनेत मोठे अवमुल्यन झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानमधील दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड भडकल्या आहेत. या महागाईचा निषेध करण्यासाठी देशभरातील दुकानदारांनी आज बंद पाळला आणि प्रमुख महामार्गांवर टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला.
पाकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील माजी नेते सिराजउल हक यांनी या बंदचे आवाहन केले होते. सिराज उल हक हे जमात ए इस्लामी पक्षाचे नेते असून त्यांना अनेक व्यापारी संघटना, उद्योगपती, कामगार संघटना आणि, बाजार संघटना, वकिलांच्या संघटना आणि वाहतुकदारांच्या संघटनांचा पाठिंबा आहे.
या संपामुळे व्यापारी राजधानी असलेल्या कराचीमध्ये कडकडीत बंद पाळला गेला.
रस्त्यांवर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची उपस्थिती नव्हती. सर्व दुकाने बंद होती. पंजाब प्रांताची राजधानी असलेल्या लाहोरमध्येही सर्व दुकाने आज बंद होती. वकील न्यायालयाच्या बाहेरच थांबले होते. तर माल वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांनीही आपली वाहने बंद ठेवली होती. पेशावर आणि क्वेट्टा शहरांमध्येही अंशतः बंद पाळला गेला होता.
पाकिस्तानमधील वार्षिक चलनवाढीचा दर ऑगस्ट महिन्यात 27.4 टक्के इतका होता, असे ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदतीचे पॅकेज मिळेपर्यंत पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता. या मदतीच्या पॅकेजची अट म्हणून पाकिस्तानला सर्व मोठी अनुदाने रद्द करावी लागली. त्यामुळे पाकिस्तानातील बहुतेक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.