दुबई: दुबईमध्ये 7 जुलैपासून पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. या पर्यटकांना अलीकडे केलेल्या कोविड-19 टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. अथवा दुबईमध्ये आल्यावर विमानतळावरच ही टेस्ट करावी लागेल, असे दुबईमधील प्रमुख वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
दुबईच्या बाहेर अडकलेल्या स्थानिक नागरिकांना आजपासून परत येण्याची परवानगीही दिली गेली आहे. त्याबरोबर उद्या (दि. 23 जून) पासून नागरिकांना आणि स्थानिक रहिवाशांनाही विदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय परदेशातील कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्याची बंदी लागू असणार नाही.
ज्या रहिवाशांकडे दुबईमध्ये दिला गेलेला व्हिसा असेल, अशांना आगाऊ आरक्षण केलेल्या विमानांमधून संयुक्त अरब अमिरातीमध्ये परतण्याची मुभा असणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना “जनरल डायरेक्टोरेट ऑफ रेसिडेन्सी ऍन्ड फॉरेन अफेअर्स’शी समन्वय साधून पूर्वअनुमती घेणे बंधनकारक असणार आहे. करोनाचा संसर्ग झाला नसल्याचे स्वतःचे प्रमाणपत्र देणे प्रवाशांना बंधकारक असेल. याशिवाय आरोग्याशी संबंधित वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालनही प्रवाशांना करावे लागणार आहे.