मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३, पुणे १, व सोलापूर शहर १ अशा ५ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात ६२ पोलीस अधिकारी व ४९५ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात एकूण ४७२९ हजार रिलिफ कॅम्प आहेत. तर जवळपास ४,२८,७३४ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. लॉकडाऊनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करावे.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉक डाऊनमध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लॉक डाऊन संपले असे नाही. उलट या काळात सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.