गणेशोत्सवासाठी बाजारपेठ सज्ज

सजावटीच्या वस्तू, पूजेच्या साहित्याला मागणी

सातारा  – सातारा शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. सार्वजनिक मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी सजावटीच्या वस्तू आणि पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. गणेशोत्सव निर्विघ्नपणे, उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनही सज्ज होत आहे.

गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपल्याने रोज लाखोंची उलाढाल होत आहे. महापुराचे आणि मंदीचे सावट गणेशोत्सवावर असले तरी आपल्या लाडक्‍या गणरायाच्या स्वागतात कोणतीही उणीव राहू नये यासाठी भक्‍त दक्षता घेत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत आरास सजावटीला लागणारी चमकी, माळा, इतर साहित्य, आकर्षक मखर उपलब्ध आहेत.

मखरांसाठी फायबर आणि कार्ड बोर्ड साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग दिसत आहे. खण आळी, राजवाडा, मोती चौक, प्रतापगंज पेठ, रविवार पेठ व उपनगरांमध्ये सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. गणेशोत्सवात मखरांची मागणी वाढली आहे. थर्माकोलवर बंदी असल्याने पर्यावरणस्नेही कापडी, कागदी मखरे बाजारात दाखल झाले आहेत.

पर्यावरणस्नेही मखर फोल्डेबल असल्याने त्यांचा दीर्घकाळ वापर करता येणार आहे. मोत्यांचे, कापडी तोरण, वॉल हॅंगिंग, कृत्रिम फुले यांचीही ग्राहक खरेदी करीत आहेत. गणपतीपाठोपाठ गौरींचे आगमन होत असल्याने गौरीच्या साजशृंगाराच्या साहित्याचीही बाजारात रेलचेल आहे. त्यात रेडिमेड साड्या, दागिने, गजरे, वेण्या, खण, मुखवटे आदी बाजारपेढठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याशिवाय सजावटीसाठी लायटिंगच्या माळा, फोकस लाइट यांच्या खरेदीवरही भर दिला जात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×