पुणे, दि. 5 -आरोग्यदायी फळ म्हणून ड्रॅगनची ओळख आहे. विशेष म्हणजे या फळाचा आकार आणि रंग आकर्षक असल्याने आपोअपच ग्राहकांचे पाय या फळाकडे आकर्षित होतात. बाजारात ड्रॅगनची आवक नुकतीच सुरू झाली आहे. मागणी चांगली असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत भावात 10 टक्के वाढ झाली आहे.
व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर म्हणाले, “”मार्केट यार्डातील फळ विभागात नगर, सोलापूर आणि सातारा भागातून ड्रॅगन फळांची रोज 5 ते 10 टन आवक होत आहे. लाल रंगाच्या या फळाला 30 ते 150 रुपये भाव मिळत आहे, तर पांढऱ्या रंगाच्या फळाला 30 ते 10 रुपये भाव मिळत आहे. येत्या पंधरा दिवसांत ड्रॅगनची आवक आणखी वाढणार आहे. शरीरातील पेशी वाढविण्यासाठी हे फळ उपयुक्त ठरते. त्यामुळेच या फळाला मागणी चांगली असते.”
बाजारात दाखल होत असलेले फळ 100 ते 600 ग्रॅमचे आहे. या फळाचा हंगाम जून ते नोव्हेंबरपर्यंत असतो. नुकताच हंगाम सुरू झाला असल्याने भाव जास्त आहेत. आवक वाढल्यानंतर भावात घट होऊ शकते. पुणे विभागात मागील दोन वर्षांत ड्रॅगन फळाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या फळाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. सुमारे 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीत हे फळ येते. तसेच झाडाच्या आकारानुसार फळे येतात. मोठे झाड असेल तर एका झाडाला 5 ते 6 किलो माल निघतो.
गुजरात ड्रॅगनचीही आवक
बाजारात पुणे विभागासह गुजरात येथूनही ड्रॅगन फळांची आवक होत आहे. गुजरातचे फळ आपल्यापेक्षा आकाराने मोठे असते. मात्र चवीला आपल्या फळापेक्षा थोडे सपक असते. गुजरातचे फळ 2 ते 3 दिवस, तर पुणे विभागातील फळ 5 ते 6 दिवस टिकते. विशेष म्हणजे पुणे विभागात तयार झालेले फळ चवदार आहे. त्यामुळे पुणे विभागातील ड्रॅगन फळाला ग्राहक प्राधान्य देतात, असेही सुपेकर आणि आंबेकर यांनी सांगितले.