‘उजनीचे पाणी कर्नाटकात जाते, पण आम्हाला मिळत नाही’

इंदापुरातील शेतकऱ्यांचा पालमंत्र्यांपुढे ठिय्या

पुणे – उजनी धरणातील पाणी कर्नाटकला जाते. मात्र, इंदापूरला मिळत नाही. तेच पाणी शेटफळ कालव्यामध्ये सोडले तर पाणीप्रश्‍न सुटण्यास मदत होईल, अशी मागणी करीत इंदापूर तालुक्‍यातील नागरिकांनी आज विधानभवन येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच ठिय्या मांडत आंदोलन केले.

इंदापूर तालुक्‍यातील अनेक गावांतील शेतकरी, सर्वपक्षीय नेते पाणी प्रश्‍नावर विधानभवन येथे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असतानाच शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. यावेळी पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दरम्यान, सध्या ज्या ठिकाणी टॅंकर बंद केले आहेत अथवा चारा छावण्या बंद केल्या आहेत त्या गरज असेल तर तत्काळ सुरू करण्यात येतील. इंदापूर तालुक्‍यातील कोरडे पडलेल्या तलावात खडकवासला धरणातील पाणी सोडण्यासाठी व्यवहार्यता पाहून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन पाटील यांनी दिले.

यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, सद्यस्थितीत पावसाळा असूनही इंदापूर तालुक्‍यात तीव्र दुष्काळ आहे. उजनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. मात्र, पिण्यास आणि शेतीलाही पाणी नाही. त्यामुळे इंदापूर, बारामती आणि दौंडमधील सर्व तलाव किमान 30 ते 40 टक्के तरी भरुन द्यावेत, यासाठीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावेत.
जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने म्हणाले की, पाणी प्रश्‍नासाठी सर्वपक्षीय शेतकरी आज आले आहेत. इंदापूरच्या हक्काचे पाणी मिटरनुसार मिळाल्यास पाणी प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लागेल. प्रताप पाटील म्हणाले की, पिण्याच्या पाण्याचा कोठा निश्‍चित करावा असा निकाल न्यायालयाने दिला आहे त्यानुसार पाणी मिळावे.

उजनी धरणातील पाणी शेटफळ कालव्यामध्ये सोडणे शक्‍य आहे का, त्याचबरोबर ही योजना तांत्रिकदृष्ट्‌या कशी राबविता येईल, यासाठीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तत्काळ सादर करावा. ही योजना राबविणे शक्‍य असल्यास येत्या आठवड्यात प्रस्ताव मंजूर करू.
– चंद्रकांत पाटील, महसूल तथा पालकमंत्री


पुणे शहराची व्याप्ती आणि त्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे इंदापुरकरांसाठी उजनीतील पाणी उचलून ते शेटफळ कालव्यामध्ये सोडल्यास तालुक्‍याला फायदा होऊन पाणीप्रश्‍न कायमचा मार्गी लागेल.
– दत्तात्रय भरणे, आमदार, इंदापूर


भीमा आणि नीरा नद्यांवर बंधाऱ्यांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढविल्यास पाणी अडून त्या-त्या गावांना त्याचा लाभ होऊ शकेल. यासंदर्भातील मागणी जिल्हा परिषदेद्वारे शासनाकडे करण्यात येत आहे. याबाबत पाठपुराव सुरू आहे.
– प्रविण माने, सभापती, जिल्हा परिषद, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)