मराठीला “अभिजात’चा दर्जा द्यावा

दिलीप बराटे : मराठी वाङ्‌मय मंडळाचे उद्‌घाटन

वारजे – समृद्ध वारसा असलेल्या मायमराठीला शासनाने अभिजात मराठीचा दर्जा द्यावा. विविधांगी साहित्याच्या वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. सोशल मीडियामुळे युवापिढी वाचनापासून काहीशी दूर होत आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सर्जनशील साहित्याचे वाचन करणे आवश्‍यक असल्याचे मत महानगर पालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी व्यक्त केले.

संस्कार मंदिर महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या “मराठी वाङ्‌मय मंडळाचे उद्‌घाटन बराटे यांच्या हस्ते करण्यात आले. बराटे म्हणाले, संत ज्ञानेश्‍वरांची ज्ञानेश्‍वरी, जगद्‌गुरू संत तुकारामांचे अभंग याबरोबरच श्‍यामची आई, बनगरवाडी, कोसला, झोंबी, बलुतं, अग्निपंख, प्रकाशवाटा यासारख्या साहित्यकृती विद्यार्थ्यांना दिशादर्शक आहेत.

साहित्य हा समाजाचा आरसा असून समाजजीवनाचे चित्रण साहित्यातून होत असते. बंडा जोशी यांची “हास्यमैफील’ विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच होती. उपरोध, उपहास यामधून प्रसंगनिष्ठ विनोद कसा निर्माण होतो याचे प्रात्यक्षिक बंडा जोशी “वाजले की बारा, पाळणा इ. मधून करून दाखवले. विंडबन गीतातून “विनोद’ कसा निर्माण होतो याचे विवेचन त्यांनी केले.

आनंदी जीवनासाठी विनोद कसा आवश्‍यक आहे याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भोईटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र थोरात यांनी प्रास्ताविकातून मराठी विभागाच्या वतीने वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×