सोलापूर (प्रतिनिधी) – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रवादी पदाचे उमेदवार व्हावेत, अशी मागणी केली आहे. त्याबद्दल आपणाला काय वाटते ? असा प्रश्न रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांना विचारला असता, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः आपण उमेदवार नाहीत असे आवर्जून सांगत असताना संजय राऊत मात्र जुन्या कढीला नवा ऊत आणत आहेत,अशी खोचक टीका करत राऊत पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा म्हणतील असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात बुधवारी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा एवढेच म्हणणे आता राऊतांचे बाकी राहिले आहे. आपल्या गावरान ढंगात त्यांनी राऊत यांना “ज्यांचे त्याला कळेना” म्हणत बोचरी टीका केली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील नेत्यांवरही खोत यांनी जोरदार टीका केली आहे.
विधान परिषद निवडणुकीवर भाष्य करताना सदाभाऊ खोत म्हणाले, निश्चितच आमचे पाच उमेदवार विजयी होणार आहेत. सहाव्या उमेदवारासाठी जी काही मतांची गोळाबेरीज करावी लागते ती होणे थोडेसे कठीण गेले असते.
म्हणूनच मी माझा सहावा अर्ज मागे घेतला आहे. मी आता जरी दोन पावले मागे आलो असलो तरी निश्चितच भविष्यकाळात देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थ साथीने मी चार पावले पुढे आल्याचे दिसून येईल, असे सदाभाऊ खोत म्हणाले.