टोलचा झोल! दिवसांत चार लाखांचा गफला; दिल्या बनावट पावत्या

तिघांना अटक ; एका लेनमधून घोळ केल्याचे निष्पन्न

पुणे – मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग चार वर खेड-शिवापूर आणि आणेवाडी या दोन टोलनाक्‍यांवर बनावट पावत्यांद्वारे दोन महिन्यापासून सुमारे साडेचार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

खेडशिवापूर टोलनाक्‍यावरील लेखा परीक्षण अहवालानुसार 24 फेब्रुवारीला सुमारे दोन हजार वाहने 24 तासांत तीन लाख 80 हजार रुपयांच्या बनावट पावती देऊन सोडल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले.

खेड शिवापूर टोलनाक्‍यावर बनावट पावत्या तयार करून वाहन चालकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार अभिजीत बाबर (रा. मंगळवार पेठ, पुणे) यांनी पोलिसांकडे केली. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीसांच्या पथकाने खेडशिवापूर टोलनाक्‍यावर खातरजमा केली असता, तेथील टोल कर्मचारी शेवटच्या लेनमध्ये टोलवसुलीची 190 रुपयांची बनावट पावती देत असल्याचे निष्पन्न झाले. सुरेश प्रकाश गंगावणे (वय 25, रा. वाई, सातारा), अक्षय सणस (22, रा. वाई, सातारा), शुभम सीताराम डोलारे (19, रा. जनता वसाहत, पुणे), साई सुतार (25, रा. कात्रज, पुणे) यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून टोलवसुलीच्या बनावट पावत्या हस्तगत केल्या. त्यांचे साथीदार हेमंत भाटे, दादा दळवी, सतीश मरगजे व अन्य साथीदारांवर वाहनचालकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अजय चव्हाण (19, रा. वाई, सातारा), संकेत गायकवाड (22, रा. जावळी, सातारा), अमोल कोंडे (36, रा. खेडशिवापूर, पुणे) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमोल कोंडे या कॉन्ट्रक्‍टर सोबतच विकास आण्णा शिंदे (रा. वाई, सातारा), मनोज दळवी (रा. भोर,पुणे), सतीश मरगजे, हेमंत बाठे या फरार झालेल्या कंत्राटदारांचा पोलीस शोध घेत आहेत. संबंधित टोल वसुलीचा पैसा या कॉन्ट्रक्‍टरचे खिशात जात असल्याचे समोर आले आहे, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

कंपनीचा बोगस झोल
महामार्गाचा हा टप्प्याच्या टोल वसुलीचा अधिकार पुणे-सातारा टोल रोड प्रा. लि. या कंपनीला प्रत्यक्षात आहे. पुणे-सातारा टोल रोड प्रा. लि. या कंपनीची टोल बनावट पावती आरोपी लॅपटॉपला प्रिंटर लावून पर्यायी सॉफ्टवेअरद्वारे छापत असत आणि ती रक्कम स्वत:च्या खिशात घालत असत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.