टोकियो – ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला बॉक्सर्सनी विजयी कामगिरी सुरूच ठेवली आहे. लोवलिनाने विजय मिळवल्यानंतर आज बॉक्सर पूजा राणीनेदेखील विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. लवलीनानंतर उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारी पूजा दुसरी बॉक्सर आहे.
पूजाने 75 किलो वर्गात अल्जीरियाची बॉक्सर इचराक चाइब हिला नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पूजा आणि इचराक दोघीही ऑलिम्पिक डेब्यू करत होत्या. पण सामन्यात सुरुवातीपासूनच पूजाने वर्चस्व प्रस्थापित करत सामना 5-0 ने जिंकला.
पूजाने पहिले दोन्ही डाव आक्रमक खेळ दाखवत पूर्ण केले. तिने चाइबला पलटवार करायला संधी दिलीच नाही. आपल्या राष्ट्रीय अनुभवाचा पुरेपूर वापर करत पूजाने सामन्यातील पहिले दोन डाव खिशात घातले. ज्यानंतर याच आघाडीच्या जोरावर उर्वरित सामन्यातही चांगले प्रदर्शन करत सामना 5-0 ने खिशात घातला.
पूजा आणि लोवलिना या दोन्ही भारतीय महिला बॉक्सर उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता दोघींनाही आपापल्या गटात अंतिम 8 मध्ये गेल्याने त्यांना पदकासाठी केवळ एक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.