विडणी, (वार्ताहर) – विडणी, ता. फलटण येथे काल (दि. 21) रात्री बिबट्याने कालवड फस्त केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. विडणी येथील 24 फाटा (राऊत वस्ती) येथील संतोष रामचंद्र नाळे यांच्या गोठ्यातील चार महिन्यांची कालवड बिबट्याने बुधवारी (दि. 21) रात्री 11.30 च्या सुमारास उसाच्या शेतात ओढत नेऊन फस्त केली. या घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी सौ. सारिका लवांडे, राजेंद्र कुंभार यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
या परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आले. बिबट्याने सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत कालवड ओढून नेली. विडणी परिसरात मोठे बागायती क्षेत्र असून, शेतकरी वर्गात भीती पसरली आहे. मुलांना अंधारात एकटे सोडू नये. शेतात रात्री जाताना किंवा शेतात असताना मोठ्याने गाणी म्हणावीत अथवा मोबाइलचा आवाज वाढवून गाणी लावावीत. शेतकर्यांनी आपली गुरे बंदिस्त गोठ्यांमध्ये ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे महावितरणने शेतीपंपांसाठी रात्रीऐवजी दिवसा विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.