तंबाखूचे सेवन ही जगभरात गंभीर आरोग्यविषयक समस्या राहिली आहे. तुम्ही जर कोणत्याही प्रकारात तंबाखूचे सेवन करत असाल, तर कोव्हिड-19 हा आजार तुम्हाला गाठण्याची शक्यता बळावते, हे ध्यानात घेणे गरजेचे आहे.
सीडीसी व डब्ल्यूएचओने देखील धूम्रपान व अधिक गंभीर स्वरूपाचा कोविड-19 आजार होण्यामध्ये संबंध असल्याचे सांगितले आहे. नुकतेच प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीमधील एका संस्थेने एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 पर्यंतच्या कालावधीसाठी सादर केलेल्या ऍबनॉरमॅलिटी अहवालाने असे सिद्ध झाले आहे की, महाराष्ट्रातील फुफ्फुसाच्या कार्यांसंदर्भातील चाचण्यांमध्ये ऍबनॉरमॅलिटीचे प्रमाण पुरूषांमध्ये जवळपास 38 टक्के, तर महिलांमध्ये 42 टक्के होते. पुण्यातील पुरूषांमध्ये हे प्रमाण 42 टक्के, तर महिलांमध्ये 53 टक्के होते.
महिलांमध्ये धूम्रपान किंवा तंबाखू सेवन करण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यांच्यामधील ऍबनॉर्मल प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त अतिप्रमाणात धूम्रपान हे देखील लक्षणीय कारण राहिले आहे. या सर्व्हेमध्ये एकूण 29,548 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये पुण्यातील 4124 व्यक्तींचा समावेश होता.
फुफ्फुसाचे आजार असताना धूम्रपान केल्यास रुग्णाची स्थिती लक्षणीयरित्या खालावू शकते. तसेच सध्याच्या कोविड-19 प्रादुर्भावामध्ये स्थिती अधिक गंभीर होऊ शकते, कारण या आजारामधून बरे होण्यास वेळ लागत असल्यामुळे त्याचे प्रतिकूल परिणाम रुग्णाच्या प्रकृतीवर होत असतात. म्हणून नागरिकांनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल करत तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याची आणि स्वत:सह कुटुंबातील सदस्यांचे उत्तम आरोग्य व स्वास्थ्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची हीच खरी वेळ आहे.
कोणत्याही प्रकारे तंबाखूच्या सेवनामुळे गंभीर स्वरूपात कोविड- आजार होण्याचा धोका वाढतो. तसेच यामुळे सीओपीडी, ब्रेन स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, दमा, फुफ्फुसाचा कर्करोग, श्वसनविषयक आजार (इंटरस्टिशियल लंग डिसीज) आणि मधुमेह अशा आजारांचा धोका देखील वाढतो. तरूण पिढी सहकाऱ्यांचा दबाव, स्टाइल स्टेटमेण्ट आणि तणावामुळे धूम्रपान व धूम्रविरहित तंबाखूचे सेवन करते. प्रबळ इच्छाशक्ती, वैद्यकीय समुपदेशन आणि तोंडी औषधोपचार धूम्रपानाच्या सवयीवर मात करण्यामध्ये मदत करतात.
तंबाखूचे सेवन व धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना सिगारेट्स ओढताना किंवा इतर तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करताना तोंडावाटे विषाणूचा संसर्ग होण्याचा उच्च धोका आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना कोविड-19 आजार झाला तर त्यांना गंभीर आजार होण्याचा उच्च धोका असतो, कारण त्यांच्या फुफ्फुसाचे आरोग्य अगोदरपासूनच कमकुवत असते.
याव्यतिरिक्त धूम्रपानाचे मानसिक व आर्थिक परिणाम देखील अत्यंत प्रतिकूल आहेत. म्हणूनच कोणत्याही प्रकारातील तंबाखूचे सेवन बंदच केल्यामुळे विविध आजार होण्याचा धोका कमी होईल आणि स्वास्थ्यपूर्ण व आरोग्यदायी जीवनशैली जगण्यास मदत होईल.