चंदीगड : पंजाबमधील व्हीव्हीआयपींना सुरक्षा काढून घेण्यासंदर्भात पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने गेल्या सुनावणीत सरकारकडून उत्तर मागितले होते. ज्यामध्ये आज पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयासमोर ‘आप’ सरकारने सर्व 424 लोकांची सुरक्षा परत देण्याचे मान्य केलं आहे.
आता 7 जूनपासून काढून घेण्यात आलेली सुरक्षा पुन्हा बहाल करण्यात येणार आहे. गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या पाच दिवसांनंतर पंजाब सरकारने आज सांगितले की, ७ जूनपासून ४२० हून अधिक व्हीव्हीआयपींची सुरक्षा कवच बहाल केले जाईल.
माजी मंत्री ओपी सोनी यांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ‘आप’ सरकारने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला ही माहिती दिली.
सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत कपात केल्याबद्दल मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती.
दरम्यान उच्च न्यायालयाने सुरक्षा कवच कमी करण्याच्या प्रश्नावर पंजाब सरकारने सांगितले की, 6 जून रोजी ऑपरेशन ब्लूस्टारच्या वर्धापन दिनानिमित्त सरकारला सुरक्षा कर्मचार्यांची गरज भासणार आहे. आम्ही ७ जूनपासून व्हीव्हीआयपींना पुन्हा सुरक्षा बहाल करणार आहोत. जून 1984 मध्ये सुवर्ण मंदिरात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यामुळे ६ जून रोजी येथे मोठा बंदोबस्त असतो.