कोपरगाव (अहमदनगर) – कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथे अज्ञात व्यक्तींनी झोपेत असलेल्या पती -पत्नीची निर्घृण हत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास दरोडा पडल्याचे चित्र भासवून दोघांची हत्या केल्याने या हत्याकांडाचे गुढ वाढले आहे. राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय 65), दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय 75, रा. आपेगाव, ता. कोपरगाव, अहमदनगर) अशी हत्या झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी गावातील एका धार्मीक कार्यक्रम आटोपून रात्री आपल्या राहत्या घरी गच्चीवर भुजाडे पतीपत्नी झोपले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या दोघांना त्या रात्री अज्ञात कारणाने व अज्ञात हत्याराने मारून निर्घृण खुन केल्याची घटना घडली. मात्र भुजाडे यांचे घर गावापासून दिड किलोमीटर दुर अंतरावर एकांतात असल्याने तसेच घरामध्ये ते दोघेच राहत असल्याने झालेल्या दुर्घटनेची कल्पना दोन दिवसांनी समजली. मयत दत्तात्रय भुजाडे यांचे दोन मुले पुण्यात कामानिमित्ताने राहतात. गेल्या दोन दिवसांपासून आई वडिलांशी संपर्क होत नाही तसेच मोबाईलवर रिंग होत असुनही फोन उचलला जात नसल्याने दत्तात्रय भुजाडे यांचा मुलगा जालिंदर दत्तात्रय भुजाडे यांना संशय आल्याने त्यांच्या भावकीतील पोपट गोपीनाथ भुजाडे (रा. तिळवणी शिवार ता कोपरगाव) यांना संपर्क साधून चौकशी करण्यास सांगितले.
पोपट भुजाडे यांनी बु़धवारी (1 जुलै) रोजी दुपारी दोन वाजता दत्तात्रय भुजाडे यांच्या घरी जावून पाहीले असता घराचे दरवाजे खिडक्या आतुन लावलेल्या होत्या. घरात कोणीही दिसत नव्हते. मात्र दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने पोपट भुजाडे यांनी घराजवळील पोलवर चढून घराच्या गच्चीवर पाहीले असता दोघेही मृतावस्थेत असल्याचे दिसुन आले.
या घटनेची माहीती पोलीसांना कळवल्यानंतर कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोलीस कर्मचारी आंबादास वाघ, इरफान शेख, सुरेश गागरे, प्रकाश नवाळे, युवराज खुळे, महेश कुसारे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी लोणी येथे पाठवण्यात आले.
या घटनेसंदर्भात अधिक माहीती देताना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव म्हणाले की, झालेली घटना अतिशय गंभिर असुन भुजाडे पती-पत्नींचा खुन कोणी केला? का केला? कशाने केला याचा शोध सुरु आहे. प्राथमिक अंदाजानुसार चोरी करण्याच्या उद्देशाने चोर आले असावेत व त्यांनी काहीतरी टनक वस्तुने मारले असावे. मयत राधाबाई यांच्या हातावर वर्मी घाव आहे तर दत्तात्रय यांच्या नाका तोंडातुन रक्तस्राव झाल्याचे दिसत असल्याने या दोघांचा मृत्यू कशाने झाले हे वैद्यकीय अहवालानंतर समजणार आहे.
दरम्यान, खुन करणाऱ्यांनी भुजाडे यांच्या घरातील कपाटांची उचकापाचक केल्याचे दिसुन येते. घरातील काही सामानाची फेकाफेक करून लुटल्याचे दिसत असल्याने हा दरोडा असवा किंवा दरोड्याच्या बहाण्याने दुहेरी खुन केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
या घटनेची माहिती कळताच अतिरीक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती जाणुन घेतली. पोपट गोपीनाथ भुजाडे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस पुढील तपास करत आहेत.