अकोले -आता काळजी घेण्याची वेळ आलेली आहे. यासाठी चेकपोस्ट वाढवण्याचा निर्णय व जिल्हा सीमा अधिक कडक करण्याचा निर्णय अकोले विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आज दुपारी जाहीर केला. याकामी शिक्षकांचाही सहभाग अत्यावश्यक राहील, अर्थात शिक्षकांना चार दिवसातून एक दिवस काम राहिल, असेही यावेळी बोलताना त्यांनी सूचित केले.
अकोले तहसीलदार कार्यालयामध्ये आज दुपारी बैठक झाली.
त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन आ.लहामटे यांनी विविध सूचना करीत चेकपोस्ट वाढविण्याच्या संदर्भात आणि जिल्हा सीमा अधिक कडक करण्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांना आदेश दिले. सध्या कळस, देवठाण, समशेरपूर, म्हैस वळण घाट, लागाचा घाट, बेलापूर घाट, केळी कोतूळ, पळसुंदे, बहीरोबा, तोलार खिंड, पाचनई, कुमशेत घाट, बारी घाट या व अन्य ठिकाणी चेक पोस्ट अधिक कडकपणे कार्यान्वित करण्याची आणि आता त्यात अधिक वाढ करण्याचे त्यांनी सूचित केले.
शिक्षकांचा चेक पोस्टमध्ये सहभाग राहील. ग्रामसुरक्षा समितीचा सहभाग त्यांना मिळेल आणि जे शिक्षक वय वर्ष पन्नाच्या आत आहेत अशा सर्वांना व महिला वगळून हे काम दिले जाईल.पोलीस, वनखात्याचे कर्मचारी, कृषी खात्याचे कर्मचारी आणि अन्य अपेक्षित घटक यात सहभागी होतील. असे त्यांनी सांगितले.
जे शिक्षक ज्या ज्या गावांमध्ये नोकरीत आहेत. त्यांनी सुरक्षा समितीला मदत करावी व गावच्या वाड्या-वस्त्यांवर जाऊन जे नवीन पाहुणे येतात.त्यांच्यावर लक्ष ठेवून ती सुरक्षा समितीला माहिती देणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागाला त्यासाठी सतर्क करणे अपेक्षित आहे. असेही डॉ. लहामटे यांनी या वेळेस स्पष्ट केले. तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, राजूर प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी प्रतिनिधी, आरोग्य अधिकारी डॉक्टर इंद्रजीत गंभीरे आदींचा यावेळी उपस्थित होते.