नवी दिल्ली – तू गोलंदाजी टाकत आहेस, का भिक मागत आहेस, दुसरीकडे सचिन उभा आहे त्याला सांग षटकार मारायला, बाप बाप होता है और बेटा बेटा होता है. हे सेहवाग गेल्या काही वर्षांपासून सांगत असलेले संवाद आमच्यात कधीही झालेच नव्हते असे स्पष्ट करत सेहवाग चक्क खोटे बोलत असल्याचा दावा पाकिस्तानचा माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केला आहे.
2004 साली भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यातील कसोटी मालिकेतील एक सामना मुलतान येथे झाला. त्यात वीरेंद्र सेवागने भारताचा पहिलाच त्रिशतकवीर फलंदाज बनण्याचा विक्रम केला होता. या खेळीदरम्यान खेळपट्टीवर सेहवाग व सचिन तेंडुलकर फलंदाजी करत होते. शोएब अख्तरला ही जोडी फोडण्यात अपयश येत होते. त्यावेळी त्याने सातत्याने बाउंसर चेंडू टाकायला सुरुवात केली व षटकार मारून दाखव असे आव्हान दिल्याचे सेहवागने सांगितले होते.
तसेच पलीकडे तुझा बाप सचिन तेंडुलकर फलंदाजी करत आहे, त्याला सांग तो मारेल षटकार असे सांगितले होते. त्याचवेळी शोएबने बाउंसर टाकला व सचिनने षटकार मारला होता. यावेळी बाप बाप होता है, और बेटा बेटा होता है, असे सेहवाग शोएबला म्हणाला होता. हाच किस्सा सेहवागने अनेकदा सांगितला होता. मात्र, असे काही घडलेच नव्हते, गौतम गंभीर देखील याची पुष्टी करेल असे सांगत शोएबने सेहवाग खोटे बोलत असल्याचे सांगितले आहे.
त्रिशतक करणारा पहिलाच भारतीय…..
भारताने या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. एकदिवसीय मालिकेनंतर कसोटी मालिका देखील भारताने जिंकली होती. तसेच 1989 सालानंतर 15 वर्षांनी भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता. या मालिकेतील मुलतान येथे झालेल्या कसोटी सामन्यात सेहवागने 309 धावांची अजरामर खेळी केली होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात त्रिशतक फटकावून सेहवाग पहिलाच भारतीय फलंदाज ठरला होता.