इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची उपासमार
निमसाखर – इंदापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन पगार गेली सात ते आठ महिन्यांपासून खात्यात जमा झालेले नाहीत.थकलेली रक्कम द्यावी यासह विविध मागण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या समोर दि. 26 जानेवारी रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून क्लार्क, शिपाई, स्वच्छता कर्मचारी यासह अनेक कर्मचारी काम करतात. गावपातळीवर काम करताना कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून 50 टक्के तर ग्रामपंचायतीच्या वसुली प्रमाणे 50 टक्के रक्कम अशी मिळून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा पगार खात्यामध्ये जमा होत असतो. सुरूवातीच्या काळामध्ये बॅंक प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या खात्याची माहिती घेतेवेळी राष्ट्रीयकृत बॅंकांबरोबरच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमध्ये खाते नंबर देण्यात आले.
दरम्यानच्या काळात इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन पगार होत गेले. मात्र नंतरच्या काळामध्ये यातील अनेक कर्मचाऱ्यांचे पगार सात ते आठ महिन्यांपासून बॅंक खात्यामध्ये जमा होत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल ग्रामपंचायत कर्मचारी संघाने घेतली आहे.
या मागण्या वेळीच मान्य न झाल्यास पुणे येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर दि. 26 रोजी उपोषण करणार आहे. याबाबतचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे सह्या असलेले लेखी निवेदन नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इंदापूरचे गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले आहेत.
यासंदर्भात इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले की, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे थकलेल्या पगाराबाबतचे लेखी निवेदन मिळाले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार थकण्याचे कारण
तांत्रिक आहे.