पुणे – विद्यार्थी आहेत; पण बसायला बेंच नाही. नळ आहेत पण प्यायला पाणी नाही, स्वच्छता गृह आहेत पण; पाणी आणि दिवेच नाहीत, अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या महापालिकेच्या शाळा आता पायाभूत सुविधांनी परिपूर्ण होणार आहेत. त्यासाठी, सरसकट शाळा दुरुस्त न करता विद्यार्थी पटसंख्या जास्त असलेल्या तसेच कमी खर्चात तातडीने दुरुस्ती शक्य असलेल्या शाळांची निवड महापालिकेकडून करण्यात आली आहे.
त्यात, पहिल्या टप्प्यात 15 शाळांची निवड करण्यात आली असून 1 ऑक्टोबरपासून या शाळांचे काम सुरू केले जाणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 15 शाळा अंतिम करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी यावेळी दिली. महापालिकेच्या अंदाजपत्रकात उपलब्ध असलेल्या निधीतून हे काम केले जाणार असून काही संस्था या कामासाठी सीएसआर देण्यासही तयार असल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले.
या सुविधांवर देणार भर
- शाळेत बसण्यासाठी बाक
- पिण्यासाठी स्वच्छ पाणी
- स्वच्छतागृहांची दुरुस्ती
- स्वच्छतागृहात नियमित पाणी
- शाळेतील भिंतीना रंग
- शाळेची नियमित स्वच्छता सुविधा
- शाळेत विद्यार्थीस्नेही सुविधा
कोट्यवधींचा खर्च तरीही दुरवस्थाच
शहरात महापालिकेच्या सुमारे 287 शाळा असून या शाळा पालिकेच्या 180 इमारतींमध्ये भरतात. या इमारती शहराच्या मध्यवर्ती पेठांसह शहराच्या उपनगरामध्ये असून गेल्या काही वर्षांत या इमारतींवर मोठ्या प्रमाणात नगरसेवकांच्या माध्यमातून खर्च करण्यात आला आहे. या शाळांसाठी प्रत्येक नगरसेवक वॉर्डस्तरीय निधीतून दरवर्षी 20 ते 50 लाखांचा निधी वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करून देत असले तरी अनेक शाळांना पिण्यासाठी पाणी नाही, शाळांच्या इमारती खराब झालेल्या असून वर्गांमधे भिंतीना रंग नाही, फरशा फुटलेल्या असून बसण्यासाठी बाक नाहीत, शाळेतील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून शाळेच्या आवारातच राडारोडा टाकल्याने तसेच नगरसेवकांच्या हट्टापायी प्रकल्प उभारल्याने मैदानांवर जागा नाही.
त्यामुळे, प्रशासनाने शाळांचे सर्वेक्षण करत त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून हा निधी नाही. त्यामुळे उपलब्ध निधीतूनच टप्प्या टप्प्याने शाळा दुरुस्त केल्या जाणार असून पहिल्या टप्प्यात 15 शाळांमध्ये पायाभूत सुविधा देण्यासह, देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. तर लगेचच दुसऱ्या टप्प्यात आणखी 30 शाळांची निवड केली जाणार आहे.