साडेसहा हजार एकर क्षेत्रावर ज्वारी ः मजुरांचा तुटवडा आणि दरवाढ
पेठ- सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात ज्वारी पीक साडेसहा हजार एकर शेती क्षेत्रात शेतकऱ्यांनी घेतले असून, इर्जिक पद्धतीने ज्वारी काढणी चालू केले आहे. या भागात मजुरांचे दर वाढले असून मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने, घरातील आणि शेजारील शेतकऱ्यांची मदत घेऊन ज्वारी काढणीची कामे चालू आहेत.
यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने सातगाव पठार भागात ज्वारीचे पीक चांगले आले आहे. साडेसहा हजार एकर शेती क्षेत्रात ज्वारी पीक असल्याने मजूर मिळणे दुरापास्त असल्याने इर्जिक पद्धतीने ज्वारी काढणी चालू आहे. पारगाव,भावडी, कारेगाव, पेठ, थुगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी आदी भागांतील शेतकऱ्यांनी ज्वारी काढणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार आदिवासी ठाकर समाजातील, मावळ, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यांतील मजूर मोठ्या प्रमाणात हजर झाले आहेत. मजुराच्या एका जोडीला ज्वारी काढणीसाठी सहाशे ते सातशे रुपये प्रतिदिन द्यावी लागतात. जी ज्वारी पाण्याने भरलेली आहे, ती उपटायला जड जात आहे आणि जी ज्वारी पाणी भरले नाही, ती उपटायला हलकी जाते. या भागांत सध्या शिरवळ वातावरण असल्याने शेतकरी सलग ज्वारी पीक काढणी करीत आहे.
- कडब्याला प्रतिशेकडा पाच ते सहा हजार भाव
शेतकरी आपली ज्वारी जनावरांसाठी खाद्य म्हणून आणि वर्षभर पुरेल इतके धान्य निघाले की त्यातील निम्मा कडबा विक्री करून उत्पन्न मिळते. सध्या ज्वारी कडबा प्रतिशेकडा तीन ते चार हजार रुपये पासून ते पाच ते सहा हजारांपर्यंत बाजारभाव आहे. ज्या ज्वारी पिकाला पाणी न देता आले आहे. त्याचा कडबा प्रति शेकडा साडेतीन ते चार हजार रुपये व पाणी भरलेल्या व पूर्ण वाढ झालेला कडबा प्रति शेकडा साडेचार ते साडे पाच हजार रुपये
भावाने विकला जात आहे. - ज्वारी पीक काढल्यानंतर पेंढ्या बांधून शेतात वाळत ठेवली जाते. त्यानंतर ताप पडल्यावर पेंढ्याची कणसे काढून ती मळणी यंत्राच्या साहाय्याने धान्य घेतले जाते. त्यानंतर कडबा ट्रॅक्टर किंवा खटारा गाडीच्या साह्याने घरी आणून हवा तेवढा ठेऊन बाकीचा विक्री केला जात आहे.
– मंगेश पवळे, राम तोडकर, प्रगतशील शेतकरी, पेठ