बारामती – रविवारी (दि. 26 नोव्हेंबर) बारामती शहरात फुल मॅरेथॉनचा थरार बारामतीकरांना अनुभवता येणार आहे. देशात तालुका पातळीवर पहिल्यांदाच अशा प्रकारची मॅरेथॉन होत असल्याने क्रीडाप्रेमी व बारामतीकरांची उत्कंठा शिगेस पोहोचली आहे.
तालुका पातळीवर प्रथमच वर्ल्ड ॲथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने आंतरराष्ट्रीय स्थरावरील मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठित कॉम्रेड मॅरेथॉन सारख्या आंतरराष्ट्रीय स्थरावरील मॅरेथॉनसाठी पात्रता निकष म्हणून बारामती पॉवर मॅरेथॉन ग्राह्य धरली जाणार आहे.
सहभागी स्पर्धकांना बारामतीचा सर्वांगीण विकास अनुभवत फ्लॅट ट्रॅकमुळे सर्वोत्तम टायमिंग साधण्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. 42 किमी , 21 किमी , 10 किमी आणि 5 किमी फन रन या कॅटेगरीमध्ये सहभागी हजारो स्पर्धक धावणार आहेत. रनिंग कॅटेगरी आणि वयोगटानुसार 8 लाखांची बक्षिसे या मॅरेथॉनसाठी निर्धारित करण्यात आली आहेत.
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार संपन्न होणाऱ्या या मॅरेथॉन साठी देशभरातील 28 राज्यांतून 2000 हुन अधिक धावपट्टूंनी नावनोंदणी केलेली आहे. त्यापैकी प्रामुख्याने अल्ट्रामॅन आयपीएस कृष्णप्रकाश, 5 वेळेस लॉंग डिस्टन्स रनिंग मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नावे असलेल्या सुफीया खान, डेका मॅन पूर्ण करणारे एकमेव भारतीय रनर प्रशांत हिप्परगी, वयाच्या 65 व्या वर्षी अल्ट्रामॅन स्पर्धा पूर्ण करणारे दशरथ जाधव आणि NDA एन.डी.ए मॅरेथॉन विजेता निशु कुमार यासोबतच देशभरातील दिग्गज धावपट्टू सहभागी होणार आहेत.
त्यामुळे क्रीडाप्रेमी बारामतीकरांची उत्कंठा शिगेस पोहोचली आहे. मॅरेथॉन ट्रॅक वर उत्तम प्रकारे ब्रँडिंग करण्यात आले असून भव्य स्वागत कमानी, पताका यांनी वातावरण निर्मिती झाली आहे. उत्कृष्ट नियोजन आणि तमाम बारामतीकर आणि बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या सदस्यांच्या परिश्रमामुळे बारामती पॉवर मरेथॉन संस्मरणीय ठरेल, असा विश्वास बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आयर्न मॅन सतीश ननवरे यांनी व्यक्त केला आहे.
या मान्यवरांची उपस्थिती
मॅरेथॉनचा शुभारंभ पहाटे 4 वाजता व सांगता समारंभ सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा अजितदादा पवार, ऑक्सिरीच ब्रँडचे प्रमुख पुनीत बालन, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव आणि अन्य सन्मानीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.