श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार झाले. या तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.
दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि शोपियन जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने शोपियन जिल्ह्यातील रेबान भागात नाकाबंदी करून शोधमोहिमेला सुरुवात केली होती.
या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करायला सुरुवात केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. या चकमकीदरम्यान तिन्ही दहशतवादी ठार झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या तिन्ही दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच ते कोणत्या गटाशी संबंधित होते, हे देखील समजू शकलेले नाही. त्याचा शोध घेणे सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच कोणत्या परिसरामध्ये आणखी दहशतवादी लपून बसलेले असण्याची व घातपात करण्यासाठी आले असावेत, याचा देखील शोध घेतला जात आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.