नवी दिल्ली – करोना काळातील आर्थिक संकटामुळे दिल्लीतील केजरीवाल सरकारने मद्यावर 70 टक्के करवाढ केली होती. स्पेशल करोना फी म्हणून ही करवाढ करण्यात आली होती, पण ती आता मागे घेण्यात आली असून येत्या 10 तारखेपासून ही करवाढ रद्द केली जाणार आहे. तथापि सरकारने दारूवर आता 20 ते 25 टक्के वॅट वाढवला आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीत लॉकडाऊनच्या कालावधीनंतर 5 मे पासून मद्यविक्रीला अनुमती देण्यात आली होती. त्यानंतर लगेच मद्यावरही 70 टक्के वाढ करण्यात आली. पण मे महिन्यात या करवाढीमुळे दिल्लीतील मद्याची विक्री 58 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे सरकारने येत्या 10 जूनपासून ही करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली.
या करवाढीमुळे नागरीकांनी दिल्ली जवळच्या शहरांकडे दारू खरेदीसाठी आपला मोर्चा वळवला होता. त्यामुळे दिल्ली सरकारचे दारूवरील उत्पन्न बुडत होते. दरम्यान मद्य उत्पादक कंपन्यांच्या संघटनेने केजरीवाल सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.