फसवणूक प्रकरणी बॅंक मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा
पिंपरी – कर्जच्या हमीकरिता कोरा धनादेश घेऊन तो परस्पर इतरांच्या खात्यावर वठविला. याप्रकरणी एसबीआय बॅंकेच्या तीन अधिकाऱ्यांसह पाच जणांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारवाडी येथे दोन वर्षांपूर्वी घडली.
महिताब श्रीवास्तव (वय 48, रा. एम्पायर स्क्वेअर, ऑटोक्लस्टर जवळ, चिंचवड), संजय शेवाडे (वय 48, रा. सांताक्रुझ, मुंबई), एस. एस. मुखर्जी, मे प्रतिभा कृषी लिमिटेडचे संजय चव्हाण (वय 41, ऍमेनोरा पार्क, हडपसर, पुणे) आणि एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. धनेश वसंतराव माळी (वय 34, रा. बाणेर रोड, औंध) यांनी बुधवारी (दि. 3) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे.
फिर्यादी माळी यांचे एसबीआय बॅंकेच्या कासारवाडी शाखेत खाते आहे. आरोपी श्रीवास्तव, शेवाडे आणि मुखर्जी हे या बॅंकेच्या शाखेत व्यवस्थापक आणि तत्सम पदावर कार्यरत आहेत. कर्जाच्या हमीसाठी स्वाक्षरी केलेला आणखी एक धनादेश पाहिजे असल्याचे सांगून आरोपींनी त्यांच्याकडून धनादेश घेतला. 26 फेब्रुवारी 2019 रोजी आरोपींनी फिर्यादी यांच्या खात्यावरून 65 लाख रुपये आरोपी चव्हाण आणि आरोपी महिलेच्या नावावर वळविले. याबाबत माळी यांनी विचारणा केली असता हे पैस फक्त दोन दिवसांसाठी वळविले असल्याचे सांगितले. दोन दिवसांनंतर माळी यांनी पैशाबाबत विचारणा केली असता आरोपींनी रक्कम देण्यास टाळाटाळ करून शिवीगाळ करीत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.