उन्नाव – उत्तरप्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातील सफीपूर कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी रात्री ट्रकने पोलिसांच्या वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन पोलिस कर्मचारी ठार झाले तर अन्य एक पोलिस कर्मचारी जखमी झाला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाला मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचा आदेश दिला आहे. ही घटना काल रात्री 9.30 च्या सुमारास घडली. त्यात एका हेड कॉन्स्टेबल आणि दोन महिला कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांचे वाहन करौंडीहून सफीपूर येथील एसआर पेट्रोल पंपाकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकने या वाहनाला जोरदार धडक दिली. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.