नवी दिल्ली – पंजाब निवडणुकीसाठी कॉंग्रेसने त्यांच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांचे नाव वगळले आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना तिवारी यांनी हे अपेक्षितच होते असे म्हटले आहे. उलट त्यांचा समावेश केला असता तर त्यांना “आनंदाने आश्चर्य” वाटले असते अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.
आपला या यादीत समावेश होणार नाही हे गुप्त नव्हते ते आधीपासूनच स्पष्ट होते असेही त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसने शुक्रवारी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी 30 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली त्यातून तिवारी आणि गुलाम नबी आझाद यांची नावे वगळण्यात आली आहेत.
हे नेते ‘जी-23’ नेत्यांच्या यादीतील सदस्य आहेत. तथापि जी 23 मधील आनंद शर्मा आणि भूपिंदरसिंग हुडा आदिंचा मात्र या यादीत समावेश आहे. दरम्यान तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी हे तिवारी यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्यांनी म्हटले आहे की कॉंग्रेस श्रेष्ठींच्या अशा संकुचित वृत्तीने कॉंग्रेसला निवडणुका जिंकण्यास मदत होणार नाही.