सातारा – कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील सराईत तीन चोरट्यांना सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, शिराळा या तालुक्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश जाहीर झाले आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हे आदेश दिले आहेत.
महादेव बाळासो कोळी (वय 30. वर्ष किल्ले मच्छिंद्रगड ता. वाळवा), किशोर कृष्णा गुजरवाडी (वय 24, रा. कोडोली ता. कराड), रोहित आनंदा देसाई (वय 23, रा. तांबे ता. कराड) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कराड तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 55 नुसार तडीपारीचा प्रस्ताव तयार करून तो हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना सादर केला होता.
समीर शेख यांनी या तीन वाहन चोरांना संपूर्ण सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, शिराळा, तालुक्यातून हद्दपारीचा आदेश दिला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही सदर टोळी सदस्यांच्या संस्थेत हालचालीस प्रतिबंध झाला नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे फार मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले आहे. सुधारण्याची वारंवार संधी देऊनही या टोळी सदस्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती.
त्यामुळे समीर शेख यांनी कलम 55 अन्वये तीन इसमानवर दोन वर्षांसाठी हद्दपारची कारवाई केली. पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस परिश्रम घेतले. कारवाईचे सामाजिक स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.