कराड – पुणे बंगळुरू महामार्गावर कोयना पुलावर दुचाकी व ट्रकच्या अपघातात आराध्या नितीन कुंभार (वय 7) या चिमुकलीचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिचे आजी, आजोबा गंभीर जखमी झाले. सोमवार दि. 26 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक घटनास्थळीच सोडून पलायन केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
बाळकृष्ण मारुती कुंभार (वय 70) व कुसुम बाळकृष्ण कुंभार (वय 65, सर्व रा. सांगवड, ता. पाटण) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मलकापूर येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महामार्गावरील कोयना पुलावर कराडहून सातारकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळतात कराड शहर अपघात विभागाचे पोलीस हवालदार खलील इनामदार व प्रशांत जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
महामार्ग पोलीस कर्मचारी सचिन पाटील व कराड शहर वाहतूक शाखेचे सुरेश सावंत हेही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले. दरम्यान, महामार्गावर वाहनचालक व बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी ती सुरळीत केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.