नवी दिल्ली – देशाचे मुख्य आर्थिक सल्लगार (सीईए) के. व्ही. सुब्रह्मण्यम् पुढील आठवड्यात निवृत्त होत आहेत. त्या पदासाठी तीन दावेदारांची नावे अर्थमंत्रालयाने निश्चित केली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे.
दिल्ली स्कूल ऑफ इकानॉमिक्सच्या पमी दुवा, नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालक पूनम गुप्ता आणि आर्थिक सल्लागार संजीव संन्याल यांचा त्यात समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
15 वे अर्थ आयुक्त एन. के सिंग यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने ही यादी बनवली असून त्यांनी त्यासाठी 10 नावांचा विचार केला होता. मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा तीन वर्षाच्या कार्यकाळ संपल्यानंतर सुब्रह्मण्यम् पुन्हा अध्यापनाकडे वळणार आहेत. आयएसबी हैदराबाद येथील प्राध्यापक असणाऱ्या सुब्रह्मण्यम् यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणुन 2018 मध्ये नियुक्ती झाली होती.
गुप्ता या एनसीएईआरमध्ये रुजू होण्यापुर्वी ग्लोबल मायक्रो अँड मार्केट रिसर्च, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन येथे इकॉनॉमिस्ट होत्या. त्यांनी यापूर्वी रिझर्व्ह बॅंक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी संबधित कामकाजाचा कार्यभार सांभाळत असत. त्यांची पंतप्रधानांच्या अर्थ सल्लागार मंडळात अर्धवेळ नियुक्ती गेल्या महिन्यात करण्यात आली होती. दुवा या रिझर्व्ह बॅंकेच्या आर्थिक सल्लगार समितीवर यापुर्वी कार्यरत होत्या. येल आणि कोनिक्टीकट विद्यापीठात त्या अध्यापन करतात. रिझर्व्ह बॅंकेच्या विविध समितीवर त्या कार्यरत होत्या.
संन्याल हे प्रिन्सिपल इकॉनॉमिक ऍडव्हायझर या पदावर 2017 मध्ये नियुक्त झाले. त्यापुर्वी ते डॉईश्च बॅंकेत व्यवस्थापकीय संचालक होते. नव्या मुख्य आर्थिक सल्लगारांची निवड होण्यापुर्वी सध्या अंदाजपत्रक पूर्व तयारी सुरू असताना आर्थिक सर्वेक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे.