कराची – बिरजॉय चक्रिवादळाच्या भीतीने पाकिस्तानच्या किनारपट्टीच्या भागातल्या हजारो नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. हे चक्रिवादळ गुरुवारी किनारपट्टीवर थडकणार आहे. वादळाच्या प्रभावामुळे सोसाट्याचा वारा सुरू असून समुद्रात उंच लाटा उसळायला लागल्या आहेत. “बिपरजॉय’ हा बंगाली शब्द असून त्याचा अर्थ “आपत्ती’ असा होतो. त्या अर्थानुरुप धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून हजारो नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.
वादळाची तीव्रता अतीतीव्र पातळीवरील 3 क्रमांकाच्या इशाऱ्याने दाखवण्यात आली आहे. बिपरजॉय वादळाच्या काळात वारे ताशी 140 ते 150 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे. तर वादळाचा वेग ताशी 170 किलोमीटर इतका असणार आहे. हे वादळ उत्तरेच्या दिशेने पुढे सरकते आहे. मात्र जमिनीवर आल्यावर त्याची दिशा पूर्वेकडे वळण्याची शक्यता आहे. थट्टा जिल्ह्यातील केती बरादर येथे आणि भारतात गुजरातच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानातील थट्टा, बदीन, सजावल, थारपारकर, कराची, मीरपूरखास, उमरकोट, हैदराबाद, ओरमारा, तांडो अल्लाहयार आणि तांडो मोहम्मद खान या भागांना वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. एकूण 3 जिल्ह्यातील 56 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे सिंध प्रांताच्या मुक्यमंत्र्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
37 ठिकाणी आ(य छावण्या उभारण्यात आल्या आहेत. सिंध, बलुचिस्तान आणि पंजाब प्रांतातल्या खेड्यांमधील लोकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तटरक्षक दल आणि नौदलाच्या बोटी किनाऱ्यालगत आणण्यात आल्या आहेत. मच्छिमारांनाही समुद्रातून बाहेर आणण्यात आले आहे. दिनांक 18 जून पर्यंत “रेड अलर्ट’ कायम ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.