इस्लामाबाद :- रशियाकडून पाकिस्तानला स्वस्तात क्रूड तेल मिळण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र या तेलासाठीची किंमत पाक सरकारने रशियाला चक्क चिनी चलनाद्वारे दिली आहे. पाकिस्तानच्या पेट्रोलियम मंत्री मुसादिक मलिक यांनी स्वतःच ही माहिती दिली आहे.
आतापर्यंत डॉलरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्याच्या धोरणामध्ये मोठा बदल पाकिस्तानकडून केला जात असल्याचे यामुळे स्पष्ट होते आहे. पाकिस्तानच्या विदेशी गंगाजळीचे प्रमाण अत्यल्प पातळीपर्यंत घसरले आहे.
विदेशी आयात करण्यासाठी केवळ चार आठवडे पुरेल एवढाच विदेशी गंगाजळीचा साठा पाकिस्तानकडे शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर या क्रूड तेलाची किंमत चिनी चलनाद्वारे चुकवण्याची वेळ आली आहे.
रशियाकडून पाकिस्तानला स्वस्तात तेलासाठी या वर्षाच्या सुरुवातीलाच एक करार झाला होता. त्यानुसार तेलाचा पहिला हप्ता नुकताच रशियातून पाकिस्तानला देण्यात आला.
कराची बंदरावर ते तेलाचे कंटेनर उतरवण्यात आले असल्याचे मलिक यांनी सांगितले. मात्र रशियाबरोबर करण्यात आलेल्या या व्यवहाराचा कोणताच तपशील त्यांनी माध्यमांना दिला नाही.