बेल्हे (वार्ताहर) – माळशेज घाटाच्या डोंगरदऱ्यातील मधुर चवीच्या, काळ्या जांभळ्या चमकणाऱ्या टपोऱ्या करवंदाची (काळी मैना) ख्याती जुन्नर परिसरात सर्वांच्याच परिचयाची आहे. सध्या वसंत ऋतूत घरोघरी विकत घेऊन चवीने खाल्ला जाणारा हा रानमेवा लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत न येता काटेरी जाळीतच अडकून पडला आहे.
जुन्नरच्या पूर्व भागातील नळवणे, आणे, बांगरवाडी, गुळंचवाडी व परिसरातील तुरळक ठिकाणी असणारी डोंगराची काळी मैना (करवंदे) जाळीतच अडकून पडली आहेत. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच करोनाने सर्वत्र धुमाकूळ माजवल्याने प्रशासनाने संचारबंदी सुरू केल्याने गावोगावी भरणाऱ्या जत्रा, आठवडा बाजारावर बंदी घातली आहे, तसेच तालुक्याच्या पश्चिम भागातील माळशेज घाट, खिरेश्वर, सीतेवाडी, हरिश्चंद्रगड डोंगराळ भागांतील दऱ्याखोऱ्यांत पिकणारी आंबटगोड चवीची करवंदे फिरून विकणाऱ्यांचा हक्काचा रोजगार बुडाला आहे.
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात बहरणारा रानमेवा स्थानिक नागरिक रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता रानावनात हिंडून, काटेरी जाळीत शिरून गोळा करतात. जुन्नर तालुक्यात उन्हाळ्यात देवदेवतांच्या भरणाऱ्या जत्रा, गावोगावच्या आठवडा बाजारात विकतात. डोंगराळ भागात पिकलेल्या करवंदांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने पाच, दहा रुपयांची किरकोळ विक्री ग्लास, कपाच्या मापाने पळसाच्या मोठ्या पानांवर खायला दिला जातो. तर दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलोनेही करवंदाची विक्री केली जाते. मे आणि जून या दोन महिन्यांत घरोघरी जाऊन विक्री करून पोट भरणाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
आरोग्यास लाभदायक
मे आणि जून या महिन्यांतच करवंद आणि जांभूळ यांसारखी फळे पिकतात. यांच्या मधुर चवीने आणि आयुर्वेदिक गुणांनी भरलेली फळे उन्हाळ्यात खायला लाभदायक असतात. जिभेवर ठेवताच तासन्तास त्याच्या विशिष्ट चवीची आठवण करून देणारा रानमेवा यावर्षी मात्र लॉकडाऊनमुळे मिळेनासा झाल्याने आठवणीतच रेंगाळत राहिला आहे.