आंबेठाण (वार्ताहर) – सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून व करोनाच्या योद्ध्यांना एक हात मदतीचा देत सुरक्षा साधने दुर्गाई हृदय प्रतिष्ठानने सुपूर्द केले आहे.
दुर्गाई हृदय प्रतिष्ठानचे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मामासाहेब शिंदे यांच्या 92 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून व आंबेठाणचे माजी सरपंच दत्तात्रय भेगडे यांच्या संकल्पनेतून प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने हा मदतीचा हात देण्यात आला आहे.
त्यांनी चाकण ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन खेड तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी व महाळुंगे इंगळे येथे म्हाडाच्या गृहप्रकल्पात नुकतेच सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसाठी एन 95 मास्क, प्लॅस्टिक शील्ड, गॉगल्स, हॅण्डग्लोज, शूज कव्हर, पीपीई किटचे 18 सेट तसेच 200 मिलीच्या हॅण्ड सॅनिटायझरच्या 100 बॉटल गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्याधिकारी बळीराम गाढवे, पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, उपसभापती भगवान पोखरकर, डॉ. कनकवले यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शामराव पवार, राजेंद्र शिंदे, माजी आदर्श सरपंच बाळासाहेब भोपे, दत्तात्रय गोरे, प्रशांत गोलांडे, महेंद्र कांबळे, संजय बोथरा, शांताराम कानपिळे, लायन्स क्लबचे विलास मांजरे, भरत जाधव उपस्थित होते.