नवी दिल्ली – करोनाप्रतिबंधक लसीचा केंद्र आणि राज्यांमध्ये मिळून 54 लाख 72 हजार डोसचा मंगळवार दुपारपर्यंत साठा झाला होता, अशी माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिली. लसीचे एक कोटी 10 लाख डोस सीरमकडून तर भारत बायोटेककडून 55 लाख डोस घेण्यात येणार आहेत. हे सर्व डोस 14 जानेवारीपर्यंत ताब्यात मिळतील, असे स्पष्ट करण्यात आले.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकारांना सांगितले की, भारत बायोटेककडून 55 लाख डोस घेण्यात येणार आहेत. त्यातील 38 लाख 50 हजार डोस प्रत्येकी 295 रुपयांप्रमाणे घेण्यात येणार आहेत. तर 16 लाख 50 हजार डोस मोफत मिळणार आहेत. त्यामूळे या एका डोसची किंमत 206 रुपयांच्या घरात असेल.
सीरमच्या कोविशिल्ड या लसीचे साठे केंद्र सरकारच्या चेन्नई, कर्नाल, कोलकाता आणि मुंबईतील औषध साठवण भंडारात दाखल झाले आहेत. याशिवाय प्रत्येक राज्याची किमान एक साठवण भांडार आहेच. तर अनेक मोठ्या राज्यांत अशी अनेक भांडारे आहेत. उत्तर प्रदेशात नऊ, मध्यप्रदेश, गुजरातेत प्रत्येकी चार, केरळमध्ये तीन तर जम्मू काश्मिर, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी अशी सुविधा उपलब्ध आहे.
आधी म्हटल्याप्रमाणे दुपारपर्यंत 54 लाख 72 हजार डोस या भांडारांमध्ये दाखल झाले आहेत. तर सीरम आणि बायोटेककडून त्यांचे संपूर्ण डोस 14 जानेवारीपर्यंत पोहोचतील. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींची हजारो जणांवर चाचणी घेतली असून त्या सर्वात सुरक्षित आहेत. त्यांचा कोणताही साईड इफेक्ट दिसलेला नाही, अशी पुस्तीही आरोग्य सचिवांसह निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी जोडली. या लसीची परिणाम कारकते विषयी बोलताना भूषण म्हणाले, ते समजण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे नागरिकांनी करोनाबाबतची काळजी जाणीवपूर्वक घेतली पाहिजे.
झायडस कॅडिला, रशियाची स्पुटनिक 5, बायलॉजिकल ई आणि जिनोव्हा या चार लसींच्या भारतातील मानवावरील चाचण्या अंतीम टप्प्यात आहेत. येत्या काही दिवसांत या लसींचे उत्पादक आपत्कालीन वापराच्या परवान्यासाठी औषध नियामकांकडे संपर्क साधू शकतात.
किमतीचा तौलनिक तक्ता (किंमत रुपयांत प्रतिडोस)
फायझर बायोनगटेक1,431
मॉडर्ना2348
सिनोव्हॅक1,027
नोव्हाव्हॅक्स1,114
स्पुटनिक 734
जॉन्सन अँड जॉन्सन734
लसीकरणाची पंचसूत्री
नागरिकांचा सहभाग, निवडणुकीच्या अनुभवाचा वापर, वैश्विक लसीकरण कार्यक्रम, शास्त्रीय आणि प्रतिबंधात्मक उपायात हलगर्जीपणा नको, सध्याच्या वैद्यकीय सुविधांकडे दूर्लक्ष नाही, या पंचसूत्रीच्या आधारे लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, असे भूषण यांनी सांगितले.