पाबळ ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस

पाबळ –ग्रामपंचायत पाबळ निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू असताना पाबळमधील वॉर्ड क्रमांक 4 व 5मध्ये चुरशीचे वातावरण झाले आहे. वॉर्ड क्रमांक पाचमध्ये माजी सरपंच व माजी सरपंच पुत्रामध्ये तर वॉर्ड क्र. 4 मध्ये माजी ग्रामपंचायत सदस्या व माजी जिल्हा परिषद सदस्याचे पुतणे यांचे लढतीकडे पाबळकरांचे लक्ष्य लागले आहे.

या दोन्ही वॉर्ड मधील “बहुसंख्य’ मतदार हे “अल्प’संख्यांक समाजाचे असून, प्रमुख लढत मात्र बहुजन समाजाचे व विरोधी पक्षाच्या दोन उमेदवारांमध्ये होत आहे. वॉर्ड क्रमांक चारमध्ये एका पत्रकाराने आव्हान निर्माण केले असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. राजकीय पातळीवरील दोन वेगळ्या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते या निवडणुकीत समोरासमोर उमेदवारी करीत असले तरी वरिष्ठ पातळीवर दिलजमाई असल्याने यावेळी कोणत्याच उमेदवाराला पक्षीय ताकद मिळत नाही. हे या वेळच्या निवडणुकीचे वास्तव तूर्त दिसत आहे.

सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाले असल्याने या निवडणुकीतील खरी स्पर्धा थंडावल्याचे वरकरणी दिसत आहे. तर आरक्षण कोणतेही येवो, सरपंच पदासह ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात यावी यासाठी एका पक्षाचे प्रमुख व जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील विद्यमान व माजी पदाधिकारी एकत्रित झटत असल्याचे दिसून येत आहेत.

गेली पंधरा वर्षे माजी खासदारांचे अधिपत्याखाली ग्राम पंचायत वर पकड ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या माजी सरपंचाची व उमेदवार पत्नीसह यावेळी पकड राहणार का? आमदार व मंत्री असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते आपली पकड निर्माण करणार, हे येत्या 18 तारखेला समजणार आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली असल्याचे दिसून येत आहे.

पाबळ ग्रामपंचायतमध्ये 17 सदस्य आहेत. त्यापैकी तब्बल सहा सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत, तर नऊ जागांवर उमेदवार आपले नशीब मतदानातून अजमावणार आहेत. त्यानंतर सरपंच पदासाठी व्यूहरचना होणार असली तरी त्याची मतदारही वॉर्ड क्रमांक 4 व 5वर अवलंबून असणार हे निश्‍चित असल्याची चर्चा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.