- सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांवर योगेश बहल यांचे गंभीर आरोप
पिंपरी – महापौर या जिजाऊ आहेत, मात्र सत्ताधारी भाजपातील नगरसेवक नगरसेवक हे अफजल खानाच्या पिल्लावळी आहेत. या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांचा विषय मंजूर करण्यासाठी 50 लाख रुपये घेतले आहेत. त्यांनी भाजपाच्या तात्कालीन मंत्र्यांनाही पैसे पुरविले आहेत. त्यामुळे डॉक्टरांना कायम करण्याचा विषय एवढ्या घाईत मंजूर करून घेतला असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी महासभेत केला. तसेच यावेळी त्यांनी अफजलखान, अफजलखान अशा घोषणा देत महापौरांच्या डायससमोर धाव घेतल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला होता.
महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अध्यापकांना कायम सेवेत समाविष्ट करण्याचा विषय आजच्या सर्वसाधारण सभेसमोर होता. यावरून बहल यांनी हा आरोप केला. यावेळी नगरसेवक बहल म्हणाले, महापौर तुम्ही आमच्यासाठी जिजाऊ आहात तुमच्याकडून अशा पद्धतीने सभागृह चालविण्याची अपेक्षा नाही. या विषयाला अनेक नगरसेवकांचा विरोध आहे.
त्यामुळेच सभागृहामध्ये फक्त एकाच आमदाराच्या गटाचे नगरसेवक उपस्थित आहेत. भोसरी मतदारसंघातील नगरसेवक उपस्थित नाही. वायसीएम रुग्णालय या डॉक्टरांच्या ताब्यात गेल्यावर त्याठिकाणी धंदा सुरू होणार आहे. तुमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी एका डॉक्टरकडून 50 लाख रुपये घेतले आहेत. हे उघड होऊ नये, यासाठी तुम्ही घाईने विषय मंजूर करून घेतला. असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर
सभागृह सभाशास्त्राच्या नियमानुसार चालविले जात नसल्याचा आरोप विरोधी पक्षासोबत सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनीही केला. नगरसेविका आशा शेंडगे म्हणाल्या, आपण विषय मंजूर करून घेण्याची घाई का करतोय. यामुळे शंकेला संधी मिळत आहे. येथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठीचे हे पवित्र मंदिर आहे. त्यामुळे आम्हाला बोलू द्या. तर नगरसेवक अभिषेक बारणे म्हणाले, आयुक्तांनी या सगळ्या विषयावर तुम्ही खुलासा करणे आवश्यक आहे. त्यानंतर कोणाला काही शंका असेल तर बोलणे योग्य आहे. त्यासाठी महापौरांनी आयुक्तांना खुलासा करण्याचे आदेश देणे आवश्यक आहे. नाहीतर ही वायफळ चर्चा कितीही चालेल.
माझा नातेवाईक ठेकेदार
डॉक्टर भरतीच्या विषयावरून आरोप करताना योगेश बहल यांचे भाषण घसरले आणि थेट माझा नातेवाईकच महापालिकेत ठेकेदार असल्याचे कबुल करून टाकले. माझ्या साडुचे विषय घेऊन मी आयुक्तांकडे गेलो असतो तर व्हेंटिलेटरचा विषय आयुक्तांनी मला मार्गी लावून दिला असता. मात्र मी आयुक्तांकडे माझ्या नातेवाईकाची शिफारस घेऊन गेलो नाही. बोलण्याच्या ओघात आयुक्तांनी बेकायदेशीर काम मार्गी लावले असती अशी कबुली देतानाच माझा नातेवाईक महापालिकेत ठेकेदारी करत असल्याचेही त्यांनी कबुल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नगरसेवकाच्या नातेवाईकाला कायद्यानुसार महापालिकेत काम करता येत नसतानाही बहल यांचा नातेवाईक काम करत असल्याचे समोर आले आहे.