शिर्डी – आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून खाती असलेल्या शिर्डीत साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेवून शिर्डीकरांच्या मागणीचा आदर केला आहे. अनेक भाविक शिर्डीत सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात.
दरम्यान, साईबाबा मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी साई मंदिर परिसरामध्ये सुरक्षारक्षक ,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चप्पल, बूट घालून प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. साईबाबा संस्थानच्या या निर्णयामुळे साई भक्तांमध्ये आनंदचं वातावरण आहे. रोज हजारोंच्या संख्येने साई भक्त शिर्डीत येत असतात. दर्शनासाठी मंदिर परिसरात चप्पल, बूट घालून प्रवेश केला जातो त्यामुळे मंदिराचे पावित्र्य खराब होत असल्याचं दिसून आलं आहे.
त्यामुळे आता साई बाबा संस्थानच्या वतीने साई मंदिर परिसरात चप्पल बूट घालून प्रवेश करण्यावर बंदीचे नुकतेच एक परिपत्रक काढण्यात आले असून या नियमाची अंमलबजावणी आज 12 मे पासून सुरू करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी विना चप्पल बुटाचे मंदिर परिसरात दिसून आले.
दरम्यान, साई बाबा संस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हंटलं आहे की… ‘सर्व प्रशासकिय अधिकारी, अधिक्षक सर्व विभागाचे विभागप्रमुख कर्मचारी यांनी श्रींचे समाधी मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश करतांना आपले पादत्राणे प्रत्येक प्रवेश व्दारा बाहेर पादत्राणे गृहावर (चप्पल स्टॅन्ड) ठेवूनच प्रवेश करावा.
तसेच संरक्षण विभागाने साईभक्त (भाविक) व सर्व ग्रामस्थ यांना साईंच्या समाधी मंदिर व मंदिर परिसरात प्रवेश देतांना पादत्राणे प्रत्येक प्रवेश व्दारा बाहेर पादत्राणे गृहावर (चप्पल स्टॅन्ड) ठेवूनच प्रवेश द्यावा. सदर परिपत्रकाची कार्यवाही दिनांक 12/05/2023 पासून तात्काळ करण्यात यावी असे., असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.