Tata Motars: नव्या वर्षात अनेकजण नवी कार खरेदी करतात. मात्र नववर्ष सुरू होताच काही कंपन्यांनी कारच्या किंमतीत वाढ केली आहे. आॅटो कंपनी मारुती सुझुकीने आपल्या सर्व कारच्या किमतीत वाढ करुन ग्राहकांना मोठा झटका दिला होता. यानंतर आता देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी असणाऱ्या टाटा मोटर्सने देखील पुढील महिन्यापासून कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या १ फेब्रुवारी २०२४ पासून कारच्या नवीन किंमती लागू होणार आहे. यापूर्वी देखील टाटा मोटर्सने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ केली होती त्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. टाटा मोटर्सने याबाबत निवेदन जारी केले आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने कारच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर आता टाटा मोटर्सने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महागाई आणि वस्तूंच्या वाढलेल्या किमतीमुळे खर्चात झालेली वाढ यामुळे कंपनीने वाढ करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जर तुमचा कार घेण्याचा विचार असेल तर तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहे. टाटा मोटर्स आपल्या पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत सरासरी ०.७ टक्क्यांनी वाढवणार आहे. यानंतर Nexon, Punch, Harrier आणि Safari सारख्या एसयूव्ही महाग होणार आहेत. याचसोबत Tiago, Altroz यासारख्या हॅचबॅक कार आणि Tigor सारख्या सेडान कार महाग होणार आहेत.
टाटा मोटर्सच्या कारच्या किंमती
कंपनीच्या टाटा नेक्सॉनची किंमत ८.१० लाख ते १५.५० लाख रुपये आहे. तर टाटा नेक्सॉन ईव्ही ची किंमत १४.७४ लाख ते १९.९४ लाख रुपये आहे. टाटाच्या सर्वात स्वस्त एसयूव्हीची किंमत ६ लाख ते १०.१० लाख रुपये आहे. टाटा पंच EV ची किंमत १०.९९ लाख ते १५.४९ लाख रुपये आहे.
31 जानेवारी पर्यंत जुन्या किमतीत वाहने खरेदी करता येणार
टाटा मोटर्स 1 फेब्रुवारीपासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. तुम्हाला 31 जानेवारी 2024 पर्यंत जुन्या किमतीत वाहने खरेदी करण्याची संधी आहे. टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात 10 डिसेंबर रोजी व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. १ जानेवारीपासून किमती ३ टक्क्यांनी वाढणार असल्याचे कंपनीने सांगितले होते. या वाढलेल्या किमती १ जानेवारीपासून लागू झाल्या आहेत. आता कंपनी १ फेब्रुवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमतीतही वाढ करणार आहे.