पुणे : एका ठेकेदाराला गाडीतील पैसे घरी नेण्याचा आळस नडला. त्याने गाडीत ठेवलेली 8 लाखाची रोकड चोरट्यांनी गाडीची काच फोडून चोरुन नेले. विशेष म्हणजे त्याने हे पैसे मित्र व इतर परिचयांकडून कामगारांचा पगार करण्यासाठी घेतले होते.
याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी प्रियतोष रामचंद्र पायगुडे (37,रा.अंकुर पार्क ,महर्षीनगर) हे सीव्हील कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी कामगारांचा पगार देण्यासाठी मित्र व परिचितांकडून 8 लाखाची रोकड गोळा केली होती. ही रोकड त्यांनी इनोव्हा कारमध्ये एका पिशवीत हॅन्डब्रेकच्या जवळील कप्प्यात ठेवली होती.
फिर्यादीने गाडी 7 ऑगस्टला सोसायटीबाहेर लावली होती. दरम्यान 9 ऑगस्टला त्यांना कारच्या डावीकडील काच फुटलेली दिसली. त्यांनी गाडी उघडून आतील रोकड पाहिली असता, ती कोणीतरी चोरल्याचे आढळले. त्यांच्या सोसायटीमध्ये गाडी लावयला जागा नसल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला इमारती शेजारीच लावली होती. मात्र रोकड घरी न नेता गाडीतच ठेवली. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस.बी.जायभाय करत आहेत.