पुणे: दरोडयाच्या तयारीतील चोरट्यांना हडपसर भागात पोलिसांनी जेरबंद केले. चोरट्यांकडून तीक्ष्ण शस्त्रे, दुचाकी, कटावणी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंधारात पसार झालेल्या चोरट्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
तिलर्कंसग गब्बरसिंग टाक (वय 28,रा. रामटेकडी, हडपसर), अजिनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 24,रा.कृष्णानगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी आणखी तीनजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हिमालय जोशी यांनी यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
टाक, गायकवाड आणि त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार हडपसर भागातील कॅनोल रस्त्यावर अंधारात थांबले होते. चोरट्यांची टोळी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या भागात रात्री साडेअकराच्या सुमारास सापळा लावला.
टाक आणि गायकवाड यांना पकडण्यात आले. झटापटीत अंधारात चोरट्यांबरोबर असलेले तीन साथीदार पसार झाले. चोरट्यांकडून तीक्ष्ण शस्त्रे, कटावणी, मिरची पूड, दोरी, दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. चव्हाण तपास करत आहेत.