पुणे (प्रभात वृत्तसेवा) – रस्त्यात थांबलेल्या मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली. सुनील तात्याराम कांबळे (वय 56 ,रा. कमल पार्क, धानोरी रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. कांबळे यांचा मुलगा नितेश (वय 28) याने याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चार दिवसांपूर्वी दुचाकीस्वार सुनील कांबळे दुपारी एकच्या सुमारास किराणा माल घेऊन निघाले होते. धानोरी-लोहगाव रस्त्यावर अचानक एका मोटारचालकाने मोटार थांबविली आणि दरवाजा उघडला. त्याचवेळी तेथून जात असलेले दुचाकीस्वार कांबळे मोटारीच्या दरवाज्यावर आदळले. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली.
अपघात घडल्यानंतर मोटारचालक तेथून निघून गेला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या सुनील यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम तपास करत आहेत.