पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याने महाविकास आघाडीकडून प्रचाराच्या नियोजनासाठी बोलविण्यात आलेली बैठक एका वेगळ्याच मागणीमुळे चर्चेत आली आहे. लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना कसबा मतदारसंघात शिवसेना म्हणून आम्ही सर्वतोपरी मदत केली. लोकसभेतही त्यांना खासदार करतो.
मात्र, कसबा विधानसभेची रिक्त होणारी जागा आम्हला सोडा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. मात्र, याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, अशी चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर ठाकरे पक्षाकडून आमच्या कार्यकर्त्यांची भावना असून, ती अद्याप आम्ही मित्रपक्षांकडे मांडली नसल्याचे सांगण्यात आले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, दीप्ती चवधरी, संजय बालगुडे, दत्ता बहिरट, अजित दरेकर, अमीर शेख, त्याचबरोबर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विभागप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, कल्पना थोरवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर आदींसह महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासंदर्भांत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या वेळी विधानसभानिहाय निवडणूक कचेरी टाकणे, शहर व विधानसभानिहाय समन्वय समिती तयार करणे, २९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता इंडिया फ्रंट आघाडीतील घटक पक्षांसोबत बैठकीचे आयोजन, पत्रकामध्ये कोणकोणत्या मुद्दयांचा समावेश असावा, महाविकास आघाडीचे विधानसभानिहाय निरीक्षक नेमणे, तसेच निवडणुकीच्या दृष्टीने विविध कमिट्या तयार करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.