मंचर -आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी स्वतः लेजर तापमापक घेऊन अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांच्या शरिराच्या तापमानाची तपासणी करण्याचे काम हाती घेतले आहे.
अत्यावश्यक सेवा देणारे दुकानदार, बॅंका व पतसंस्था येथील कर्मचारी, पाणी विक्रेते, भाजी विक्रेते, मेडिकल स्टोअर्स, पोलीस कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांचे थर्मामीटर यंत्राच्या साहाय्याने तापमान मोजले जात आहे. सरपंच गांजाळे हे स्वतः फार्मासिस्ट आहेत. गुरुवारी दिवसभरात सुमारे 400 नागरिकांच्या शरीराच्या तापमानाची नोंद घेण्यात आल्याची माहिती सरपंच गांजाळे यांनी दिली. ही नोंद आठवड्यातून दोन वेळा घेतले जाईल.
चाकण येथील अंडी विक्रेता करोना पॉझिटिव्ह सापडल्याने खबरदारी म्हणून मंचर येथे अत्यावश्यक सेवा देणारे आणि बाहेर गावावरुन येणारे कर्मचारी याचे तापमान घेण्यात येत आहे. सरपंच दत्ता गांजाळे यांनी अत्यावश्यक सेवा असणाऱ्या सर्व दुकानात जाऊन तसेच बॅंका, पतसंस्थामध्ये जाऊन तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तापमान तपासले. प्रत्येक व्यक्तीच्या तापमानाची नोंद वैयक्तिक माहितीसह नोंदवून ठेवण्यात आली आहे.
एखाद्या कर्मचाऱ्याच्या तापमानात बदल आढळल्यास त्याची उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेण्यात येईल. ग्रामपंचायत कर्मचारी अतुल लोंढे, दिलीप थोरात, नरेंद्र निघोट या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या तापमानाच्या नोंदी ठेवून दर आठवड्याला यांची पुन्हा तपासणी होईल. आरोग्य तपासणी मोहीम ग्रामपंचायत प्रशासनाने हाती घेतली असून करोनाचा एकही रुग्ण शहरात येऊ नये, याची खबरदारी घेतली जात असल्याचे ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे यांनी सांगितले.